Saturday, 17 November 2012

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन



शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन
शनिवार, 17 नोव्हेंबर 2012 


गेली चार दशके महाराष्ट्राच्या मनामनांवर अधिराज्य गाजवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ऊर्फ बाळ केशव ठाकरे यांचे आज (शनिवार) वयाच्या 86 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. गेले काही दिवस शिवसेनाप्रमुखांच्या तब्येतीत चढ-उतार होत होते. मात्र शनिवारी दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणारे लीलावती रुग्णालयाचे डॉक्‍टर डॉ. जलील परकार यांनी दिली.

दरम्यान, शिवसेनाप्रमुखांचे पार्थिव रविवारी सकाळी सात वाजल्यापासून अंतिम दर्शनासाठी शिवाजी पार्कवर ठेवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

गेल्या मंगळवारपासून शिवसेनाप्रमुखांची प्रकृती चिंताजनक झाल्यावर "मातोश्री' निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे कळताच अवघ्या महाराष्ट्राला दिलासा वाटला होता. शुक्रवारीही शिवसेनाप्रमुखांची तब्येत सुधारत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र शनिवारी दुपारी त्यांच्या प्रकृतीतील सुधारणा धीमी झाली असल्याचे शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी स्पष्ट केले आणि पाठोपाठ दुपारपासूनच "मातोश्री'वरची लगबग वाढल्याचे दिसायला लागले. सुरवातीला राज ठाकरे हे पत्नी शर्मिलासह मातोश्रीवर दाखल झाले. त्यांच्यानंतर भाजपचे नेते विनोद तावडे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि पाठोपाठ भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे हेसुद्धा मातोश्रीवर पोचले. मातोश्रीवरची लगबग वाढल्याचे पाहून या ठिकाणी गेले दोन ते तीन दिवस ठाण मांडून असलेल्या शिवसैनिक आणि चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती आणि घडलेही तसेच.

सायंकाळी पावणेपाचच्या दरम्यान शिवसेनाप्रमुखांवर सातत्याने उपचार करणारे लीलावती रुग्णालयाचे डॉक्‍टर जलील परकार, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि दिवाकर रावते आदी नेते मातोश्रीबाहेर आले. आणि डॉ. परकार यांनी शिवसेनाप्रमुखांनी अखेरचा श्‍वास घेतल्याची माहिती दिली. गेल्या चार दशकांचा हा झंझावात थांबल्याचे ऐकून उपस्थित शिवसेना नेते, हजारो कार्यकर्ते आणि चाहत्यांना शोक अनावर झाला होता.

शिवसैनिकांनी कोणत्याही प्रकारे संयम सुटू देऊ नये. शांतता कायम राखावी. स्वतः शिवसेनाप्रमुखांना शांतता अभिप्रेत होती. त्यामुळे कार्यकर्ते आणि चाहत्यांनीही अखेरपर्यंत संयम आणि शांतता कायम राखावी, असे आवाहनही प्रवक्ते संजय राऊत यांनी केले.

दुपारी 3 वाजून 33 मिनिटांनी निधन
दुपारी चार वाजता मातोश्रीवर लगबग वाढली
राज्यभरातील पोलिसांना सतर्कतेचे आदेश
मातोश्रीबाहेरच्या पोलिस बंदोबस्तात वाढ
4 वाजून 47 मिनिटांनी निधनाची घोषणा
आज स. 7 वा.पासून शिवाजी पार्कवर अंतिम दर्शन

प्रतिक्रिया - 
नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष 
शिवसेनाप्रमुखांच्या जाण्याने आमचा कुटुंबप्रमुख गेला आहे. राज्यात आणि देशात शिवशाहीचे सरकार यावे ही बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. ती प्रत्यक्षात उतरवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

गोपीनाथ मुंडे, भाजप नेते 

युतीचा आधारस्तंभ हरपला असल्याची प्रतिक्रिया गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केली.

छगन भुजबळ, नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस 
शिवसेनाप्रमुखांच्या जाण्याने कुटुंबातील सदस्य गेल्याचे दुःख झाले अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. 

राजकारणातील दिलदार नेता हरपला - शरद पवार
शरद पवार म्हणाले, ''काही दिवसांपूर्वी मी मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली होती. तेव्हा बाळासाहेब नेहमीच्या खोलीत होते. त्यांच्याकडे पाहताना अखेरपर्यंत त्यांनी संघर्ष केला, हे स्पष्ट दिसत होते. गेल्या ४५ वर्षांपासून आमचा परिचय होता. बाळासाहेब एक विशिष्ट विचारधारा ठेवून आयुष्याचे मार्गक्रमण करत होते. महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास, मराठी माणसाची भूमिका, महाराष्ट्रातून देशासाठी हवे ते योगदान देण्याची तयारी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. बाळासाहेबांनी अन्य विरोधी राजकीय पक्षांवर कायम टीका केली, पण व्यक्तिगत टीका कधी केली नाही. मराठी, मुंबईसाठी बाळासाहेबांचे योगदान मोठे आहे. शिवसेनेची स्थापना केल्यानंतर हजारो शिवसैनिक आणि शिवसेनेचे चाहते शिवाजी पार्कवर जमले होते. त्यावेळी मी काँग्रेसमध्ये होतो. शिवाजी पार्कवर जाऊन सभेतील त्यांचे भाषण ऐकले होते. चार महिन्यांपूर्वी मी त्यांना लीलावती रुग्णालयात भेटायला गेलो होतो, तेव्हा त्यांच्याशी मी बराच वेळ चर्चा केली होती. बाळासाहेबांचे योगदान कायम उपयुक्त ठरणार आहे. सत्तेच्या पदापासून दूर राहण्याची भूमिका कौतुकास्पद होती. बाळासाहेबांचे नाव इतिहासात नोंदले जाईल.''

स्त्रोत : ई-सकाळ